
आश्वी खुर्द पोस्ट ऑफिसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह; विलीनीकरणाच्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये चिंता
आश्वी, संजय गायकवाड

गेल्या ४२ वर्षांपासून परिसरातील हजारो नागरिकांचा आर्थिक कणा ठरलेले आश्वी खुर्द येथील पोस्ट ऑफिस बंद करून ते आश्वी बुद्रुक पोस्ट ऑफिसमध्ये विलीन करण्याच्या हालचाली श्रीरामपूर पोस्ट कार्यालयाकडून सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. या संभाव्य निर्णयामुळे आश्वी खुर्दसह परिसरातील ग्रामस्थ आणि खातेदारांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.

आश्वी खुर्द पोस्ट ऑफिसला २ जानेवारी १९८४ रोजी अधिकृत मान्यता मिळून ४१३७३८ हा स्वतंत्र पिनकोड देण्यात आला होता. वरवंडी, पानोडी, शेडगाव, शिबलापूर, पिंपरी लोंकी-अजमपूर व खरशिंदे आदी गावांचे दैनंदिन टपाल व आर्थिक व्यवहार याच पोस्ट ऑफिसवर अवलंबून आहेत.सध्या येथे १५ हजारांहून अधिक सक्रिय खातेदार असून आर.डी., मुदत ठेवी, किसान विकास पत्र, एमआयएस, ज्येष्ठ नागरिक योजना आदी माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. विशेष म्हणजे हे पोस्ट ऑफिस तोट्यात नसून नफ्यात सुरू आहे. तसेच लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना व घरकुल योजनांचे व्यवहारही याच ठिकाणी होतात.हे पोस्ट ऑफिस बंद झाल्यास ज्येष्ठ नागरिक, महिला व शेतकऱ्यांना आश्वी बुद्रुकला जावे लागणार असून याचा फटका स्थानिक बाजारपेठेलाही बसण्याची शक्यता आहे.“जुनी हक्काची सेवा बंद करून नागरिकांची गैरसोय कशासाठी?” असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत असून, राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी केली जात आहे. वेळेत निर्णय न झाल्यास आश्वी खुर्दचा स्वतंत्र पिनकोड आणि हक्काचे पोस्ट ऑफिस कायमचे गमावण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

0 Comments