प्रवरा पब्लिक स्कूलचा ६० वा क्रीडा महोत्सव जल्लोषात

लोणी, प्रतिनिधी
“विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकांपुरते मर्यादित राहू नये. खेळ हे त्यांच्या व्यक्तिमत्त्व घडवणारे उत्तम माध्यम आहे. शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना, शिस्त आणि सकारात्मकता यांची शिदोरी खेळातून मिळते,” अशा शब्दांत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांना खेळांचे महत्त्व पटवून दिले.

प्रवरानगर ता. राहाता येथील प्रवरा पब्लिक स्कूलच्या ६० व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा समारोप दिमाखदार संचलनासह झाला. १४ ते १७ नोव्हेंबरदरम्यान विविध स्पर्धांनी गजबजलेल्या मैदानात शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. चारही सदनांच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आकर्षक संचलनाने वातावरण भारावून गेले. क्रीडाध्वजाला दिलेल्या मानवंदनेने समारोपाची सुरुवात झाली.

समारोप प्रसंगी बोलताना डॉ. विखे यांनी शालेय जीवनातील खेळांच्या आठवणी सांगत व्यायामाचे महत्त्व विशद केले. “प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून नव्या पिढीतील खेळाडूंना व्यासपीठ मिळत आहे. विद्यार्थ्यांनी या संधींचा लाभ घ्यावा,” असे त्यांनी आवर्जून सांगितले.
क्रीडा महोत्सवात धावण्याच्या १००, २००, ४००, ८०० मीटर शर्यती, लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, अडथळा शर्यती अशा सर्व पारंपरिक खेळांचे नियोजन करण्यात आले होते. प्राथमिक विभागासाठी मनोरंजनात्मक खेळ, तर पालकांसाठी मजेदार स्पर्धा घेण्यात आल्या.

स्पर्धेतील चमकदार क्षण
अटीतटीच्या चुरशीच्या लढतींत नेताजी सदनाने सर्वाधिक गुण मिळवून वार्षिक क्रीडा करंडकावर आपली छाप उमटवली. सरदार पटेल सदन द्वितीय, तानाजी सदन तृतीय तर शिवाजी सदन चतुर्थ स्थानी राहिले.
मुलांच्या गटात युवराज आहेर, वैभव कवटेकर, ओमराज घाडगे, महेंद्र पाडवी यांनी तर मुलींच्या गटात तेजस्विनी भोये आणि सृष्टी अडसूळ यांनी वैयक्तिक चॅम्पियनशिप पटकावली. बेस्ट स्पोर्ट्समन ऑफ द इयर हर्षल पाडवी, तर बेस्ट स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर उन्नती वर्पे ठरल्या. शिस्तबद्ध संचलनाचा मानही नेताजी सदनाने मिळवला.

विजेत्या खेळाडूंना डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते पदक, प्रमाणपत्रे आणि करंडक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. बी. बी. अंबाडे, उपप्राचार्य के. टी. अडसूळ, सौ. एम. एस. जगधने, सौ. शुभांगी रत्नपारखी उपस्थित होते.
क्रीडा संचालक रमेश दळे, डी. के. जाधव आणि क्रीडा शिक्षकांच्या टीमने महोत्सवाचे नियोजन सुरेखरीत्या पार पाडले. सूत्रसंचालन सौ. सीमा क्षिरसागर व श्री. संतोष ढगे यांनी तर आभारप्रदर्शन रमेश दळे यांनी केले.

0 Comments