
अवैध घरकुल बांधकामावर ग्रामस्थांचा संताप — प्रशासन झोपेत!
ग्रामपंचायतीच्या तीन नोटिसांकडे दुर्लक्ष; अधिकाऱ्यांशी अरेरावी, पोलीसही हतबल!
आश्वी,वैभव ताजणे,
प्रतापपूर, (ता. संगमनेर) गावात घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या एका लाभार्थ्याने नियम धाब्यावर बसवत अनधिकृतपणे बांधकाम सुरू केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. ग्रामपंचायतीने तिनवेळा नोटिसा बजावूनही बांधकाम सुरू असल्याने “अवैध कामांना ग्रामपंचायत आणि प्रशासन घाबरतंय का?” असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

धोंडीराम गंगाराम आंधळे यांनी या प्रकरणी ग्रामपंचायत आणि आश्वी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. मात्र, अनेक दिवस उलटूनही कारवाईचा ‘नामो निशाणा’ नसल्याने ग्रामस्थ प्रशासनावर नाराज आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी शिंदे यांना घरकुल योजनेअंतर्गत २५ बाय २५ फूट क्षेत्रावर बांधकामाची परवानगी मिळाली होती. मात्र त्यांनी मंजूर क्षेत्रापेक्षा अधिक जागेत बांधकाम सुरू केले असून, त्या जागेची मालकी आणि वैधतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
चौकट : नियमभंग स्पष्ट — तिसरी नोटीस प्रक्रियेत
“ग्रामपंचायतीने आतापर्यंत दोन वेळा लेखी नोटिसा बजावल्या असूनही शिंदे यांनी दुर्लक्ष केले आहे. नियमानुसार २१९ चौरस फूट क्षेत्रावर घरकुल बांधकामास परवानगी असते; परंतु संबंधिताचे बांधकाम सुमारे ६२५ चौरस फूट असल्याने ते अवैध ठरते. तिसरी नोटीस लवकरच दिली जाईल. त्यानंतर मासिक बैठकीत (मिंटिंगमध्ये) या प्रकरणावर चर्चा करून पुढील कारवाई केली जाईल.”
भाऊसाहेब राशिनकर, ग्रामविकास अधिकारी

ग्रामपंचायतीचे अधिकारी काम थांबवण्यासाठी घटनास्थळी गेले असता, शिंदे यांच्या कुटुंबीयांकडून अरेरावी व विरोध करण्यात आला, असा आरोप तक्रारदार आंधळे यांनी केला आहे. या सर्व प्रकारामुळे ग्रामपंचायतीने प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी (BDO) यांनाही नोटिसांच्या प्रती पाठवल्या आहेत. पंचायत समिती कार्यालयाने पाहणीसाठी अधिकारी पाठवले असता, त्यांनाही शिंदे यांच्या नातेवाईकांकडून विरोधाचा सामना करावा लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

चौकट : सरपंचाचा ठाम पवित्रा
“सदर काम गावठाण क्षेत्रात आहे. घरकुल कामासाठी केवळ २५ बाय २५ फूट क्षेत्राची मंजुरी आहे आणि घरकुल निधी त्याच मर्यादित बांधकामासाठी मिळतो. अतिरीक्त बांधकामासाठी घरमालकाने स्वतःचा खर्च करावा लागतो. दोन नोटिसा देण्यात आल्या असून तिसरी नोटीस दोन दिवसांत दिली जाईल. ग्रामपंचायतीने नियमांनुसार सर्व कारवाई केली आहे. मंजूर आराखड्याबाहेर बांधकाम झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला आहे.”
पांडुरंग आंधळे, सरपंच प्रतापपूर

गावातील काही तथाकथित पुढाऱ्यांकडून संबंधित लाभार्थ्यास राजकीय पाठबळ मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.वेळेत आळा न घातल्यास अशा प्रकारांना खतपाणी मिळेल आणि गावातील शिस्त धोक्यात येईल,” असा इशारा तक्रारदार धोंडीराम आंधळे यांनी दिला.
प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून
“ग्रामपंचायतीच्या नोटिसांना केराची टोपली दाखवणारे हे काम थांबवले नाही, तर गावात संतापाचा ज्वालामुखी उसळेल!” अशी ग्रामस्थांची तीव्र भावना व्यक्त होत आहे.

0 Comments