आश्वी खुर्दच्या भडकवाड कुटुंबानं पिढ्यान् पिढ्या जपली मांतग समाजाची ओवाळणी परंपरा
संगमनेर,वैभव ताजणे
दिवाळीचा सण म्हणजे केवळ दिवे आणि मिठाई नव्हे, तर संस्कृतीचा आणि परंपरेचा सोहळा. हीच परंपरा आजही जिवंत ठेवली आहे.संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील मांतग समाजातील विशाल भडकवाड कुटुंबाने त्यांच्या बरोबर राजु राक्षे व राहुल भडकवाड हे सोबती बरोबर असतात. त्यांच्या अंगी असलेली लोककलेची ओढ, पारंपरिक वाद्यांचा नाद आणि ओवाळणी मागण्याची रीत, हे सर्व मिळून ग्रामसंस्कृतीचा खरा आत्मा जिवंत ठेवतात.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशाल भडकवाड कुटुंबातील सदस्य ढोल, ताशा, हलगी, शिंग यांसारख्या पारंपरिक वाद्यांसह गावातील घराघरात भेट देतात. गावातील मंडळी या लोककलावंतांचे आदरपूर्वक स्वागत करतात, वाद्यांचे पूजन करतात. प्रत्येक वाद्यात त्यांच्या श्रद्धेचा आणि परिश्रमाचा नाद दडलेला असतो.
यानंतर दिवाळी पाडव्याच्या दिवशी, हीच मंडळी पुन्हा गावातील प्रत्येक उंबरठ्यावर जाऊन ओवाळणी मागतात. या ओवाळणीचा हेतू केवळ आर्थिक नसून, ती आहे आपुलकी आणि संस्कारांची परंपरा. गावभर नाद घुमतो, “ओवाळणी द्या माय, सण सुखाचा करा आरंभ!”

विशाल भडकवाड सांगतात की,”आमच्या मांतग समाजात ही परंपरा आमच्या पूर्वजांकडून चालत आली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्ही वाद्यांचे पूजन करून शुभशकुन नेतो, आणि पाडव्याच्या दिवशी प्रत्येक दारी जाऊन ओवाळणी मागतो. ही आमच्यासाठी संस्कृती आणि अस्तित्वाचा भाग आहे. पुढच्या पिढ्यांनीही ही रीत जपावी, हेच आमचं समाधान आहे.


पूर्वी दिवाळीच्या सकाळी जेव्हा भडकवाडांच्या ढोलाचा नाद गावभर घुमायचा, तेव्हा दिवाळीचं आगमन झाल्याची जाणीव व्हायची. आजही तीच भावना कायम आहे. “भडकवाड आले म्हणजे दिवाळी आली,” असं म्हणत गावकरी या रितीचा अभिमान बाळगतात.ही परंपरा आज केवळ मातग समाजापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण गावाच्या एकतेची आणि संस्कृतीची ओळख बनली आहे. शरद भडकवाड,उपाध्यक्ष,भारतीय दलित महासंघ
संस्कृतीचा सुगंध जपणारे भडकवाड ,आजच्या यांत्रिक काळात परंपरा हरवत असल्या तरी आश्वी खुर्द मध्ये ती अजूनही हृदयात वसलेली आहे. भडकवाड कुटुंबाने केवळ वाद्य नाही, तर गावाच्या आत्म्याचा सूर जिवंत ठेवला आहे.
0 Comments