
मांडवे, शिंदोडी, रणखांब, हिवरगाव व जांबुत गावांसाठी सुरू होणार ३ शालेय फेर्या; रऊफ शेख आणि अॅड. अमित धुळगंड यांची पाठपुरावा भूमिका

आमदार खताळ यांच्या सूचनेनंतर एस.टी. प्रशासनाची तत्काळ दखल — पठारभागातील विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा
साकूर, युनूस शेख
संगमनेर तालुक्यातील साकूर पठार परिसरातील मांडवे, शिंदोडी, रणखांब, हिवरगाव व जांबुत या गावांतील विद्यार्थ्यांना साकूर येथे शाळा व महाविद्यालयात येण्यासाठी आणि घरी परतण्यासाठी बससेवेचा अभाव भासत होता. या गैरसोयीमुळे अनेक विद्यार्थी दररोज पायी प्रवास करत असून, पालकांनाही याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.

ही समस्या लक्षात घेऊन भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख व अॅड. अमित धुळगंड यांनी आमदार अमोल खताळ पाटील यांची भेट घेऊन साकूरहून मांडवे, शिंदोडी, रणखांब, हिवरगाव व जांबुत या भागांसाठी सकाळ, दुपार व संध्याकाळ अशा तीन शालेय फेर्या सुरु करण्याची मागणी केली.या मागणीची आमदार खताळ पाटील यांनी तातडीने दखल घेत, संगमनेर आगार व्यवस्थापक श्री. प्रशांत गुंड यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर रऊफ शेख व अॅड. धुळगंड यांनी आगारप्रमुखांची भेट घेऊन विषय मांडला असता, श्री. गुंड यांनी तत्काळ हालचाल सुरू करत असल्याचे व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी लवकरच आवश्यक बसफेऱ्या सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.

स्थानिक नागरिकांनी आमदार खताळ यांच्या तातडीच्या हस्तक्षेपाचे कौतुक करत आभार मानले असून, विद्यार्थ्यांना आता प्रवासासाठी दिलासा मिळणार आहे.
“साकूर पठारातील विद्यार्थी अनेक दिवसांपासून बससेवेअभावी त्रस्त होते. या भागातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुरक्षित व नियमित प्रवास सुविधा मिळावी, हा आमचा मुख्य हेतू होता. आमदार अमोल खताळ पाटील यांनी आमच्या मागणीची तातडीने दखल घेत तत्परता दाखवली, याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.” रऊफ शेख,जिल्हाध्यक्ष, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा
0 Comments