सेवानिवृत्त प्राचार्य गिते यांचा सन्मान समारंभ; ‘डिजिटल अभियान’साठी देणगीचा संकल्प करून शिक्षकत्वाचा नवा आदर्श

संगमनेर, वैभव ताजणे
३१ वर्षांच्या सेवेतून निवृत्त होत असतानाही, गिते सरांनी सन्मानासाठी खर्च होणारी रक्कम शाळेच्या ‘डिजिटल अभियानासाठी’ देणगी स्वरूपात देण्याचा संकल्प करून शिक्षकत्वाचा नवा आदर्श घालून दिला. सेवानिवृत्ती सत्कारप्रसंगी बोलताना आमदार तांबे म्हणाले, “सध्याचे राजकारण चांगले राहिलेले नाही; मालुंजे गावातील लोकांनी त्याचा अनुभव घेतला आहे. पण शेडगावकर मात्र त्यापासून जरा लांब राहिले. समाजकारण करण्यासाठी राजकारण नव्हे, तर शिक्षण आणि ज्ञानदान हाच श्रेष्ठ मार्ग आहे. माझी प्रामाणिक विनंती आहे,गिते सरांनी राजकारणाच्या प्रवाहात वाहून जाऊ नये. ते आजही विद्यार्थ्यांच्या मनात जिवंत आहेत.”
“राजकारणातून नव्हे, तर शिक्षणातूनच खऱ्या अर्थाने समाजकारण साध्य होते. शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असतो; त्याच्याकडूनच माणूस घडतो, विचार घडतो आणि राष्ट्र घडते.” या प्रेरणादायी शब्दांत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्याजित तांबे यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालय, शेडगाव (ता.संगमनेर) सेवानिवृत्त प्राचार्य अशोकराव नामदेव गिते यांच्या दीर्घ सेवेला सलाम केला.

आजच्या बदलत्या काळात राजकारणाचे स्वरूप झपाट्याने बदलले आहे. सत्तेच्या स्पर्धेत माणुसकी आणि मूल्यांची गळचेपी होत असताना काही व्यक्ती अजूनही आपल्या कार्यातून समाजाला दिशा देत आहेत. अशा व्यक्तींमध्ये शिक्षण क्षेत्रातील सेवाभावी शिक्षक, समाजासाठी ज्ञानाचा दीप पेटवणारे प्राचार्य अशोकराव गिते हे नाव अग्रस्थानी आहे.नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्याजित तांबे यांनी त्यांच्या सेवानिवृत्ती सत्कारप्रसंगी गिते सरांच्या कार्याला मनःपूर्वक दाद देत एक विचार मांडला.

तांबे यांनी पुढे सांगितले, “आदरणीय हरीभाऊ दादा सांगळे आणि सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे अतूट संबंध होते. आमच्या तांबे परिवाराचे त्यांच्याशी जुने ऋणानुबंध आहेत. प्राचार्य गिते हे हरीभाऊ दादांचे जावई आणि माझे इंग्रजीचे शिक्षक. प्रत्येक भेटीत ते विद्यार्थ्यांसाठी नवनवीन योजना राबवण्याचे विचार सांगत असत. अशा शिक्षकामुळेच आज समाज विचारशील झाला आहे.”

आमदार सत्याजित तांबे यांची भावनिक आठवण “मी सहावीपर्यंत अमृतवाहिनीच्या इंग्रजी माध्यमात शिकलो, नंतर मराठी माध्यमात गेलो. पण आज जेव्हा मी इंग्रजी भाषेत संवाद साधतो, देशात किंवा विदेशात तेव्हा माझ्या इंग्रजी शिक्षक प्राचार्य अशोकराव गिते आणि प्राध्यापक घारे मॅडम यांच्या शिकवणीची आठवण होते. त्यांनी माझ्या भाषेचा पाया भक्कम केला, म्हणूनच आज मी आत्मविश्वासाने इंग्रजी बोलू शकतो.”
सत्याजित तांबे, आमदार नाशिक पदवीधर मतदारसंघ

“सेवानिवृत्ती म्हणजे थांबणे नव्हे”
“सेवानिवृत्तीनंतर घरात माणसाची खरी परीक्षा सुरू होते. प्रत्येक गोष्ट संयमाने हाताळली तर जीवन अधिक सुंदर बनते. माझ्या सन्मानासाठी खर्च होणारी रक्कम जर शाळेच्या ‘डिजिटल अभियानासाठी’ वापरली गेली, तर त्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होईल. हेच माझ्या कार्याचे खरे समाधान आणि सेवेला साजेसा सन्मान आहे.”
अशोकराव गिते,सेवानिवृत्त प्राचार्य़
आमदार तांबे म्हणाले, “वय हा केवळ आकडा आहे. मन तरुण असेल, विचार जागा असेल तर प्रत्येक दिवस समाजासाठी काहीतरी नवीन करण्याची संधी असते.आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेत — राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, सेनाधिकारी ते शिक्षिका सर्वत्र त्यांची उपस्थिती आहे. सह्याद्री शिक्षण संस्थेने ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणासाठी मोठे कार्य केले आहे. ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेमुळे अनेक मुलींची गैरसोय होत होती; ती कमी व्हावी म्हणून मी सरकारचे लक्ष वेधले.”
शिक्षणसंस्था लोकसहभागातून चालतात. सरकार फक्त पगारासाठी मदत करते, पण इतर खर्चांसाठी साधन नसते. तरीही या संस्था समाजाच्या पाठिंब्यावर उभ्या आहेत — हेच खरे शिक्षणसेवेचे सामर्थ्य आहे,” असेही तांबे यांनी स्पष्ट केले.गिते सरांच्या सेवाभावी वृत्तीने आणि त्यांच्या ज्ञानदानाच्या संकल्पाने समाजाला पुन्हा शिक्षकाचे खरे स्थान दाखवून दिले. त्यांनी स्वतःसाठी नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विचार केला,हेच त्यांच्या जीवनाचे सार.आज त्यांचे शब्द, विचार आणि कृती एकच संदेश देतात “राजकारण नव्हे, समाजकारणाचा मार्ग शिक्षणातूनच!”
यावेळी,प्राध्यापक कान्हु गिते,अशोक गीते, तहसीलदार सौ. चैताली दराडे, निवृत्ती सांगळे, डॉ. रामदास आंधळे, डॉ भानुदास आंधळे, शांताराम फड, रंगनाथ फड, अंकुश कांगणे, दिलीप नागरे ,ग्रामविस्तार अधिकारी नागरे सखाराम भाऊ नागरे, नामदेवराव गीते, सुभाष नामदेव गीते, डॉ. किरण गिते, कैलास आंधळे, गुनाभाऊ आंधळे, दत्तू नागरे, ज्ञानेश्वर साळवे, सखाराम कदम, सरपंच राजेंद्र बर्डे, सुरेश फड, सतपाल नागरे, शितल उगलमुगले, भारती नागरे, मुलगा अमित अशोक गीते व सून अदिती अमित गीते यांच्यासह सह्याद्री परिवार, शेडगाव ग्रामस्थ, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास काकड यांनी केले, तर चंदन पवार सर यांनी सूत्रसंचालन केले.
0 Comments