“आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे माणूस वेगवेगळ्या आजारांच्या विळख्यात सापडत आहे” — भारत गीते


आश्वी,वैभव ताजणे
“आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे माणूस वेगवेगळ्या आजारांच्या विळख्यात सापडत आहे. वेळेवर तपासणी न झाल्यामुळे किरकोळ आजार गंभीर स्वरूप धारण करतात. त्यामुळे अशा सर्वरोग निदान शिबिरांच्या माध्यमातून जनतेमध्ये आरोग्य जागरूकता निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. गावपातळीवर अशा उपक्रमांचे सातत्य राखले पाहिजे,असे प्रतिपादन भाजप किसन मोर्चाचे सचिव तथा जनसेवा मंडळाचे अध्यक्ष भारत गीते यांनी केले.

पिंप्री लौकी–अजमपूर (ता.संगमनेर) ग्रामपंचायत,विविध विकास सहकारी सोसायटी व मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, डोळे, त्वचा, हाडे, स्त्रीरोग, दंत तपासणी आदी विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या.

“शारीरिक आणि मानसिक आरोग्य या दोन्ही गोष्टींचा परस्पर संबंध आहे. मन निरोगी असेल तर शरीरही तंदुरुस्त राहते. सध्याच्या काळात मोबाईल, ताणतणाव, असंतुलित आहार, झोपेचा अभाव यामुळे युवकांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगट आरोग्याच्या समस्यांना सामोरे जात आहेत.दररोज थोडा वेळ स्वतःसाठी देऊन व्यायाम, योगा, ध्यान या माध्यमातून आरोग्य टिकवणे गरजेचे आहे. ‘प्रतिबंध हाच उपचार’ या तत्वानुसार आपले जीवन जगले तर औषधांवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही.”. प्राध्यापक अशोक गिते,संचालक सायन्स क्लास, आश्वी खुर्द ता. संगमनेर

या शिबिराचे उद्घाटन विकासो मा चेअरमन प्रभाकर दातीर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी भाऊसाहेब लावरे, प्राध्यपक अशोकराव गिते, सिताराम दातीर, भाऊसाहेब मुंढे,रमेशराव कदम,भिकाशेठ गिते,पोपटराव दातीर भाऊसाहेब लावरे, नवनाथ दातीर, बापुसाहेब दातीर, मज्जु पिंजारी सह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थितित होते. शिबिरात मेडिकव्हर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सविस्तर तपासणी करून नागरिकांना आवश्यक सल्ला दिला. ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थित आरोग्यसेवक, स्वयंसेवक व ग्रामस्थांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.
0 Comments