ज्ञानराज माऊली वारकरी शिक्षण संस्थेला पिण्याच्या पाण्याचे जार भेट — सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम
आश्वी | वैभव ताजणे

“संतांच्या शिकवणीप्रमाणे सेवा, सहकार्य आणि संस्कार हेच आमच्या कार्याचे मूळ आहे. पाण्याचे हे जार ही केवळ भेट नसून समाजसेवेची आणि मानवतेची ओल आहे. ज्ञानराज माऊली संस्थेसारख्या संस्था आपल्या संतपरंपरेचे जतन करत आहेत, हे आपल्या समाजासाठी प्रेरणादायी आहे,” असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष संजय गायकवाड यांनी केले.कै. कुंडलिक धोंडीबा पा. गायकवाड सेवाभावी संस्था, आश्वी खुर्द (ता. संगमनेर) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी आणि अध्यात्मिक संस्कारांचा सुंदर संगम साधणारा हा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत येथील ज्ञानराज माऊली वारकरी शिक्षण संस्था यांना पिण्याच्या पाण्याचे जार भेट देण्यात आले.

कार्यक्रमाला ह.भ.प. सुनिल पवार महाराज, ह.भ.प. ज्योतीताई पवार, संतोष भडकवाड, अदिनाथ जाधव, दगडु गायकवाड, बाजीराव दातीर, रमेश साबळे, इशीनाथ जाधव, गोविंद दुबे, ज्ञानेश्वर पवार, गोकुळ पवार तसेच भाविक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या धार्मिक प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांना आणि भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, या सामाजिक जाणिवेतून कै. कुंडलिक धोंडीबा पा. गायकवाड सेवाभावी संस्था यांच्या वतीने हे जार भेट देण्यात आले.

पुढे अध्यक्ष संजय गायकवाड म्हणाले,“हा उपक्रम केवळ सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा नाही, तर अध्यात्मिक संस्कार, मानवी मूल्ये आणि सहकार्याच्या संस्कृतीचा सजीव संदेश देणारा ठरला आहे. संस्कार, सेवा आणि सहकार्य यांची सांगड घालणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरेल.”

ह.भ.प. सुनिल पवार महाराज यांच्या प्रेरणेतून कार्यरत असलेली ही संस्था गेली अनेक वर्षे ग्रामीण भागातील सुमारे ३५ विद्यार्थी-विद्यार्थिनींना गायन, वादन, तबला, संस्कृत, रामायण, महाभारत, श्रीमद्भागवत अशा विषयांसह अध्यात्मिक आणि नैतिक शिक्षण देत आहे. संत परंपरेचे संवर्धन हेच ध्येय मानून, या संस्थेचे विद्यार्थी दरवर्षी आळंदी, पैठण, त्र्यंबकेश्वर, ताराहाबाद, ओझर, निधर्णेश्वर अशा पवित्र स्थळांपर्यंत पायी दिंडी सोहळ्यांचे आयोजन करतात.
0 Comments