गावालगत दिवसा चोरी; पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवरही प्रश्न

आश्वी,वैभव ताजणे

आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथे सोमवारी (दि. १०) आठवडे बाजाराच्या दिवशी भर दिवसा चोरट्यांनी बंद घर फोडून सुमारे २ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गावालगत झालेल्या या चोरीमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस यंत्रणेच्या दक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आश्वी–निमगावजाळी रस्त्यालगत म्हसे वस्तीवरील लक्ष्मण किसन घोडके यांच्या घरात ही चोरी झाली. घोडके कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले असताना सकाळी ९ ते दुपारी १ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आतील दोन लोखंडी कपाटांची उचकापाचक केली. त्यातून दीड तोळ्याची सोन्याची पोत, सर, कानातले आणि २० हजार रुपयांची रोकड असा एकूण २ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.घटनेची नोंद आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १९१/२०२५ नुसार बीएनएस कलम ३०५(अ), ३३१(३) प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुद्ध करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान, सोमवारी गावात आठवडे बाजार भरलेला असल्याने रस्त्यावर मोठी वर्दळ होती. अशा वेळी भर वस्तीत दिवसाढवळ्या चोरी होणे म्हणजे चोरट्यांचा बेफिकिरीचा परमोच्च बिंदू आणि पोलिसांच्या गस्त व्यवस्थेतील ढिलाईचे दर्शन असल्याचे नागरिकांचे मत आहे.
गेल्या काही महिन्यांत परिसरात चोरीच्या घटना वाढल्या असून अनेक गुन्ह्यांचा तपास वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलीस कारवाईबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिकांनी चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्याची मागणी केली आहे. तसेच, नागरिकांनी स्वतःही सुरक्षेची खबरदारी घेण्याचे, घराला दुहेरी कुलूप लावण्याचे आणि शेजाऱ्यांशी संपर्कात राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांनी केले आहे.

यापूर्वीही शिबलापुर येथे कृषी साहित्य दुकानात चोरी झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने २४ तासांतच आरोपींना मुद्देमालासह पकडले होते.या चोरीप्रकरणातही अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तत्परतेने कार्यवाही करतील का, याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे.
0 Comments