जाहिरात,बातमी देण्यासाठी संपर्क करा, पत्रकार वैभव ताजणे, मो ७७०९२५४९२४


साकुर- युनूस शेख
गेल्या अनेक दशकांपासून तालुक्यातील साकूर पठार भागाचा प्रलंबित पाणी प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे. जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे या भागाला नवसंजीवनी मिळणार आहे, या कार्यक्रमासाठी पठार भागातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांनी केले आहे

साकूर पठार भागातील सहा उपसा सिंचन योजना जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित करून एकत्रित उपसा सिंचन योजना आणि कोल्हापूर बंधारे बॅरेज योजना राबविण्याच्या कामाचा सर्वेक्षण शुभारंभ शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता साकूर येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा.खा. डॉ. सुजय विखे पाटील व आमदार अमोल खताळ उपस्थित राहणार आहेत. जलसंपदा मंत्र्यांचा दौरा आणि पाहणीयावेळी मंत्री विखे पाटील साकूर, जांबुत, मांडवे केटिवेअर, बिरेवाडी आणि मांडवे बुद्रुक येथील झिरपी तळ्याची पाहणी करणार आहेत. पाहणीनंतर साकूर येथील ‘आशिर्वाद मंगलकार्यालय’ येथे प्रकल्पासंबंधी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
जनतेला दिलेला शब्द पूर्ण! दरवर्षी उन्हाळ्यात साकूर पठार भागात पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून डॉ. सुजय विखे पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान “हा प्रश्न सोडवणार” असा शब्द जनतेला दिला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रालयात १० जून २०२५ रोजी विशेष बैठक घेऊन अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर सहा बॅरेज बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली आहे. मुंबई येथे झालेल्या या बैठकीला आमदार अमोल खताळ, भाजपा तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले, अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, इसाक पटेल, मन्सूर पटेल, खांबे सरपंच रवींद्र दातीर, ॲड. अमित धुळगंड आदींची उपस्थिती होती.
या बैठकीत जलसंपदा विभागाने “बॅरेज बंधारे उभारणे” हा सर्वोत्तम पर्याय म्हणून मांडला होता, ज्यामुळे साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल, अशी चर्चा झाली.
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण या मंजुरीनंतर पठार भागातील शेतकऱ्यांमध्ये अपार आनंदाचे वातावरण आहे. “बोले तैसा चाले त्याची वंदवी पाऊले” या उक्तीप्रमाणे डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेला शब्द पाळला, अशी प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.
थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे : सहा उपसा सिंचन योजना जलसंपदा विभागास हस्तांतरित
कोल्हापूर बंधारे बॅरेज स्वरूपात एकत्रित योजना
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सर्वेक्षण शुभारंभ — १४ नोव्हेंबर
पठार भागातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाय
शेतकऱ्यांचा आनंद आणि प्रशासकीय स्तरावर गती

0 Comments