रयतच्या विद्यार्थी संवाद कार्यक्रमात मूल्य शिक्षण, कृतज्ञता व प्रामाणिक प्रयत्नांचा संदेश
आश्वी, वैभव ताजणे
“आई-वडील हे मुलांचे पहिले गुरू असतात. त्यांच्या निःस्वार्थ प्रेम, कष्ट आणि त्यागावरच मुलांचे भविष्य घडते,” असे मार्मिक प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग अहिल्यानगरचे साहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या अश्वी इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथील भेटी दरम्यान आयोजित विद्यार्थी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य देवराम वडितके, पर्यवेक्षक दिपक चव्हाण, तसेच शिक्षक रमेश थेटे, मोहन घिगे,अनिता गाडे, सुवर्णा वाकचौरे, राजेंद्र बर्डे, वैशाली सोसे आणि हरिभाऊ कोकाटे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने या संवादात सहभाग नोंदवला.

प्रमोद तोरणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आई-वडील कधीच मुलांकडून अपेक्षा करत नाहीत. विद्यार्थी जर एक साधे ‘धन्यवाद’ किंवा ‘आभारी आहे’ एवढेच मनापासून म्हटले, तरी त्या शब्दांनी त्यांच्या आयुष्यात अपरिमित आनंदाचा शिखर गाठल्याचा अनुभव त्यांना मिळतो.” आजच्या स्पर्धात्मक युगात फक्त अभ्यासापुरते न थांबता, चांगला माणूस होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पालकांप्रती आदर, शिक्षकांबद्दल कृतज्ञता, शिस्तबद्ध जीवनशैली, वेळेचे नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास या गुणांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, असे त्यांनी सांगितले. “मोठी स्वप्ने पाहा; पण त्यासाठी प्रामाणिक मेहनत हीच तुमची खरी भांडवल आहे,” असे प्रेरणादायी विचार त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले.

प्राचार्य देवराम वडितके म्हणाले की, शिक्षणासोबत नैतिक मूल्ये, आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि सामाजिक जाण ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत. शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना “स्वतःवर विश्वास ठेवा, जिद्द ठेवा आणि पालक व शिक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा उत्तम विद्यार्थी बना,” असा संदेश दिला.संपूर्ण संवाद सत्रात विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, प्रेरणा आणि आत्मविश्वासाची लहर दिसून आली. या भेटीमुळे त्यांच्या मनात पालकांविषयी आदर, शिक्षणाविषयी गांभीर्य आणि भविष्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन दृढ झाला.

0 Comments