शेतकऱ्यांसाठी ‘नव्या आशेचा किरण’ ठरेल उपसा सिंचन प्रकल्प — आमदार अमोल खताळ

आश्वी,वैभव ताजणे
“साकूर पठारातील नागरिकांनी अनेक वर्षे दुष्काळाची झळ सोसली आहे. आता त्यातून मुक्तता देणे ही सरकारची जबाबदारी आहे. उपसा सिंचन योजना हा या भागासाठी कायमस्वरूपी उपाय ठरेल,” असा ठाम विश्वास जलसंपदा मंत्री व पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.


मांडवे (ता.संगमनेर) येथील झिरपी तलाव, बिरेवाडी पाझर तलाव आणि जांबूत येथील केटीवेअरची मंत्री विखे पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीवेळी आमदार अमोल खताळ, जलसंपदा विभागाचे अभियंते आणि स्थानिक अधिकारी उपस्थित होते.

उपसा सिंचन योजनेला सुरूवात — सर्वेक्षण जलदगतीनेपाहणीदरम्यान जलसंपदा विभागाने उपसा सिंचन प्रकल्प सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. या योजनेसाठी आवश्यक सर्वेक्षण प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.मुळा धरणाच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या साकूर पठारातील गावांना या योजनेद्वारे स्थिर पाणीपुरवठा मिळेल. “आवश्यक सर्व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करा,” अशा स्पष्ट सूचना विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.शेती, रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी चालनायोजनेची अंमलबजावणी झाल्यानंतर शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचित होऊन शेतीची उत्पादकता वाढेल. पाणी उपलब्ध झाल्यामुळे पिकांची विविधता वाढेल, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि स्थलांतरातही मोठी घट होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांसाठी नव्या आशेचा किरण” — आमदार अमोल खताळ, या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल प्रतिक्रिया देताना आमदार अमोल खताळ म्हणाले, “साकूर पठारातील शेतकऱ्यांना उपसा सिंचन प्रकल्प हा नव्या आशेचा किरण ठरेल. अनेक दशकांनंतर या भागात विकासाची ठोस पावले उचलली जात आहेत. आगामी काही महिन्यांत सर्वेक्षण पूर्ण होऊन प्रकल्पाचा आराखडा अंतिम होईल.

”ग्रामस्थांची अपेक्षा — ‘हे पाऊल ऐतिहासिक ठरेल’पाहणीदरम्यान स्थानिक ग्रामस्थांनीही या निर्णयाचे स्वागत करत आशा व्यक्त केली की, “आमच्या भागात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठ्याची योजना राबवली जात आहे. पाणी मिळाले तर आमचे आयुष्य बदलून जाईल.”साकूर पठारासाठी ही योजना केवळ पाणीपुरवठा नव्हे तर सर्वांगीण विकासाचा पाया ठरणार आहे. आगामी काही महिन्यांत प्रकल्पाला प्रत्यक्ष स्वरूप येण्याची चिन्हे दिसत असल्याने संपूर्ण पठारात उत्सुकतेचे वातावरण आहे.

0 Comments