
४४ वर्षांनंतरही नातं तसंच… ‘नो थॅंक्स, नो सॉरी’ची मैत्री काळावर मात करते अशोक गिते
आश्वी खुर्द येथे १९८१ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे भावनिक स्नेहसंमेलन; मैत्री म्हणजे व्यवहार नव्हे, तर ऋणानुबंध पुन्हा आधोरेखित
आश्वी | वैभव ताजणे
प्रत्येक नात्यात काही ना काही अपेक्षा असतात; पण मैत्री हे असे नाते आहे, जिथे कोणतीही अपेक्षा नसते, कोणताही व्यवहार नसतो. मैत्री म्हणजे व्यवहार नव्हे, तर आयुष्यभर जपले जाणारे नाते असते. मी गेली २६ वर्षे नोकरीनिमित्त अमेरिकेत वास्तव्यास आहे. देश बदलला, जीवनशैली बदलली; मात्र गाव, माणसं आणि मैत्री तशीच राहिली, मैत्री म्हणजे व्यवहार नव्हे, तर ऋणानुबंध असे भावनिक प्रतिपादन अमेरिकेत स्थायिक झालेले इंजिनिअर अशोक गिते यांनी केले.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन, आश्वी खुर्द (ता. संगमनेर) येथील सन १९८१ च्या दहावीच्या बॅचचे स्नेहसंमेलन मिलेनियम फार्मर ऑफ इंडिया राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रगतशील शेतकरी चांगदेव सोनवणे यांच्या श्वेता फार्म (आश्वी खुर्द) येथे नुकतेच संपन्न झाला. चार दशकांहून अधिक काळानंतर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत, आयुष्याच्या प्रवासाचा लेखाजोखा मांडला.

ते पुढे म्हणाले,माझे मूळ गाव आश्वी खुर्द जवळील पिंप्रीलौकी–अजमपूर आहे. जेव्हा जेव्हा मी भारतात किंवा गावाकडे येतो, तेव्हा माझा मुक्काम हमखास मित्र चांगदेव सोनवणे यांच्या घरीच असतो. आम्ही केवळ बालपणाचे मित्र नाही, तर खऱ्या अर्थाने भावंडांसारखे वावरतो. आमच्या नात्यात ‘धन्यवाद’ किंवा ‘माफी’ या शब्दांची गरज कधीच भासली नाही.शाळेपासून आयुष्यापर्यंतचा प्रवास स्नेहसंमेलनात उपस्थित अनेक मित्र आज निवृत्त झाले असले, तरी त्यांच्या चेहऱ्यावर शालेय जीवनातील खोडकरपणा आणि निरागस आनंद स्पष्ट दिसत होता. वर्गात बसलेली ती मुले आज आजोबा-आजी झाली आहेत; मात्र मैत्रीचा धागा अजूनही तितकाच घट्ट आहे, हे या कार्यक्रमातून प्रकर्षाने जाणवले.

या स्नेहसंमेलनास पुणे येथील प्रसिद्ध डीसीसी इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड,व्यवस्थापकीय संचालक अनिल म्हस्के,चांगदेव सोनवणे, इंजिनिअर अशोक गिते, स्मिता गिते, नाथा लावरे, बाळासाहेब चितांमणी, अशोक भोसले, डॉ ज्ञानदेव साबळे, दामू फड, गजानन मांढरे, नंदू वालझाडे, वत्सला गावडे, बेबी थोरात,रोहिणी नागरे, रंजना काळे, सुशिला बेंद्रे, छाया गायकवाड, सुरेखा वांबोरीकर,भागुबाई वर्पे यांच्यासह अनेक ज्येष्ठ मित्र-मैत्रिणी, त्यांची मुले, सुना, जावई व नातवंडेही या कार्यक्रमास उपस्थित होती.
विशेष म्हणजे, इंदापूरचे प्रसिद्ध व्यावसायिक बाळासाहेब चितांमणी हे सहकुटुंब (पत्नी,मुलगी, जावई व्याही, नातवंडे) उपस्थित होते.

इंजिनिअर अशोक गिते यांनी आपल्या मनातील इच्छा व्यक्त करताना सांगितले की,माझ्या सेवेला अजून चार वर्षे शिल्लक आहेत. भविष्यात संधी मिळाल्यास आपल्या बॅचमधील सर्व मित्रांचे एक गेट-टुगेदर अमेरिकेत घ्यावे, अशी इच्छा आहे. मात्र सर्वांना व्हिसा मिळणे हेच मोठे आव्हान आहे. तरीही मनात ही मैत्री जपण्याची आस कायम आहे.
प्राथमिक शिक्षक अनिल कांगणे यांनी सांगितले, माझे वडील तुकाराम कांगणे हे देखील याच बॅचचे विद्यार्थी,या स्नेहसंमेलनाची माहिती मिळताच वडिला बरोबर या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी मी खास मुंबईहून आणि बंधू इंजिनिअर अजित हा पुण्याहून येथे आलो.वडिलांना मित्र-मैत्रिणींना भेटताना त्यांच्या डोळ्यांत आनंद पाहून समाधान वाटले. वयाच्या उतारातही अशीच निस्वार्थ, निरपेक्ष मैत्री जपली जावी आणि सर्वांनी निरोगी आयुष्य जगावे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
जी नाती अपेक्षांवर उभी असतात ती काळाच्या ओघात बदलतात; मात्र ज्या नात्यांना व्यवहाराची गरज नसते, ती नाती आयुष्यभर साथ देतात. “नो थॅंक्स… नो सॉरी” या तत्वावर उभे असलेले मैत्रीचे नाते काळ, अंतर, देश आणि परिस्थिती यांवर मात करते, हेच या स्नेहसंमेलनातून पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाले. अनिल म्हस्के,डीसीसी इन्फोटेक,पुणे

चार दशकांनंतर ही टिकून असलेली ही मैत्री, नात्यांमध्ये व्यवहार नव्हे तर भाव असावा, याचे जिवंत उदाहरण ठरली. काळ कितीही बदलला तरी खरी मैत्री कधीच जुनी होत नाही, हेच या स्नेहसंमेलनातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. चांगदेव सोनवणे,प्रगतशिल शेतकरी,आश्वी खुर्द


1 Comment
Ashok Ganpat Gite · January 8, 2026 at 2:02 pm
हा कार्यक्रम शाळेत घेतला असता तर अधिक चांगले वाटले असतेपरंतु 44,वर्षांनी एकत्र येणे फार अवघड काम आहे. मी सुद्धा या विद्यालयाचा 1983 च्या बॅच मधील आहे.आम्ही सुद्धा 24 ऑक्टोबर 2025 रोजी शाळेत गेट टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. केकान सर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते 73 विद्यार्थी पैकी 37 जण. उपस्थित होते.आपली उपस्थिती जास्त आहे.