
चणेगाव येथे मका पीक शेतीशाळा प्रशिक्षण संपन्न; उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर भर
आश्वी| वैभव ताजणे,7709254924


मका हे पीक खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तिन्ही हंगामात घेतले जाणारे प्रमुख नगदी पीक असून बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च व बदलती पीक पद्धती लक्षात घेता शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. शेतीशाळा ही कृषी विस्ताराची महत्त्वाची संकल्पना असून त्यातून शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजना व नवीन तंत्रज्ञानाची माहिती प्रभावीपणे देता येते, असे प्रतिपादन कृषी अधिकारी प्रांजल कवडे पाटील यांनी केले.


कृषी विभागाच्या वतीने चणेगाव (ता.संगमनेर) येथे रब्बी हंगामातील मका पिकाच्या योग्य व्यवस्थापनासाठी मका पीक शेतीशाळा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होत्या.या प्रशिक्षणात मका पिकाचे एकात्मिक पीक व्यवस्थापन, सुधारित लागवड पद्धती, योग्य वाण निवड, बीजप्रक्रिया, संतुलित खत व्यवस्थापन, पाणी नियोजन, कीड व रोग नियंत्रण तसेच उत्पादन वाढीसाठी आवश्यक आधुनिक उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.



प्रांजल कवडे पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात मार्गदर्शन करताना मका पिकामधील उत्पादनवाढीची सूत्रे, खर्च कमी करून नफा वाढवण्याचे उपाय तसेच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी याविषयी सखोल माहिती दिली. योग्य नियोजन, वेळेवर फवारणी व माती परीक्षणावर आधारित खतांचा वापर केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चितपणे वाढू शकते, असेही त्यांनी सांगितले.

या मका पीक शेतीशाळा प्रशिक्षण वर्गास इंद्रभान धमक, भास्कर पाटोळे सर, बाजीराव खेमनर, राजेंद्र खेमनर, सुनील पाटोळे, नामदेव खेमनर, बापूसाहेब खेमनर, विठ्ठलदास असावा यांच्यासह गावातील अनेक प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रशिक्षणामुळे मका पिकाविषयी प्रत्यक्ष शेतीत उपयुक्त ठरणारे मार्गदर्शन मिळाल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

1 Comment
DR.Vitthaldas Asawa · January 24, 2026 at 12:45 pm
शेती शाळा ही शेतकऱ्यांनां मार्गदर्शक आहेत.