संगमनेर, वैभव ताजणे, 7709254924
संगमनेर तालुक्यात आश्वी बुद्रुक व उंबरी बाळापूर येथे एका रात्रीत चार घरफोड्या. दरोडेखोरांनी सोने व लाखोंची रोकड लंपास; पोलिसांवर प्रश्नचिन्ह.

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक व उंबरी बाळापूर परिसरात शनिवारी पहाटे सशस्त्र दरोडेखोरांनी अक्षरशः धुमाकूळ घालत नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. एकाच रात्री तब्बल चार ठिकाणी घरफोड्या करून चोरट्यांनी अंदाजे १० ते १५ तोळे सोने आणि सव्वा दोन लाखांहून अधिक रोकड लंपास केली. या धाडसी चोरींमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पहिली घटना शेडगाव–उंबरी बाळापूर नव्या पुलालगत असलेल्या ‘हॉटेल बानाई’ येथे घडली. येथे मौल्यवान वस्तू न सापडल्याने चोरट्यांनी खाद्यपदार्थांवरच ताव मारत पुढील लक्ष्य गाठले. त्यानंतर भाऊसाहेब खेमनर यांच्या वस्तीवर धाड टाकत २ तोळे सोने, २५ ते ३० हजारांची रोकड आणि मोबाईल चोरून नेण्यात आला. आवाज ऐकून बाहेर आलेल्या हौशीराम (पप्पू) खेमनर यांच्यावर दगडफेक करून चोरटे पसार झाले.
यानंतर रात्री दीडच्या सुमारास प्रवरा कालव्यालगत चांगदेव उंबरकर यांच्या घरात घुसून चोरट्यांनी दहशत माजवली. घरातील सदस्यांना कुऱ्हाड व कातीचा धाक दाखवत १० ते १२ तोळे सोने आणि सुमारे ३० हजारांची रोकड लंपास करण्यात आली. यावेळी एका वृद्ध महिलेच्या कानातील दागिने हिसकावून घेताना तिचे कान फाडल्याची अमानुष घटना घडली. प्रतिकार करणाऱ्या प्रतीक उंबरकर यांच्यावरही दगडफेक करण्यात आली.
दरम्यान, आश्वी बुद्रुक येथील मांची रोड परिसरातील मच्छिंद्र होडगर यांच्या घरावरही डल्ला मारत ४ ते ५ तोळे सोने आणि तब्बल १ लाख ७३ हजारांची रोकड चोरून नेण्यात आली. ही घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच आश्वी पोलीस ठाण्याचे अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक कर्मचारी आणि डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले. मात्र, एका रात्रीत सलग चार ठिकाणी दरोडे पडूनही पोलिसांना याची कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने त्यांच्या गस्त व गुप्त माहिती यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“गस्त कुठे होती ?” नागरिकांचा संतप्त सवाल
७ ते ८ जणांची टोळी संपूर्ण परिसरात मोकाट फिरत होती, घरफोड्या करत होती, नागरिकांवर हल्ले करत होती; तरीही पोलिसांना याचा मागमूस लागला नाही. त्यामुळे पोलिसांची रात्रीची गस्त पूर्णपणे अपयशी ठरल्याची तीव्र टीका होत आहे.
या प्रकरणी गुन्हा क्र. ७०/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०५(a), ३३१(६), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ पुढील तपास करत आहेत.दरम्यान, काही दिवसांपूर्वी म्हसे वस्ती परिसरात झालेल्या चोरीचे आरोपी अद्याप मोकाट असल्याने नागरिकांमध्ये भीती अधिकच वाढली आहे.दरोडेखोरांना तात्काळ अटक करून नागरिकांना सुरक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.


























0 Comments