आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथे बिबट्याचा हल्ला; जखमी महिलेवर उपचार सुरू, मादी बिबट पिल्लासह जेरबंद

आश्वी,वैभव ताजणे
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात सुमनबाई बाळासाहेब खेमनर या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली व उपचारांची माहिती घेतली.

या घटनेची तात्काळ दखल घेत जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार शाखा २ चे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार व रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ७० ते ८० जणांची टीम सज्ज झाली आणि बिबट पकडण्यासाठी मोठी शोधमोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेला यश मिळाले असून शनिवारी केरुजी बाचकर यांच्या गट क्रमांक २३६ मधील गिनी गवताच्या शेतात एक मादी बिबट तिच्या पिल्लासह जेरबंद करण्यात आली. तरीही परिसरात आणखी बिबट असल्याची शक्यता लक्षात घेऊन शोधमोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे.
बिबट्याच्या हल्ल्यानंतर जखमींवर तात्काळ उपचार करणे अत्यंत आवश्यक असते. प्राण्याच्या चाव्यामुळे रेबीजचा धोका असल्याने अँटी-रेबीज लस देणे गरजेचे आहे. तसेच गंभीर जखमांमध्ये रेबीज इम्युनोग्लोब्युलिन (RIG) इंजेक्शन जखमेच्या आसपास दिले जाते आणि टिटॅनस (TT) इंजेक्शनही दिले जाते.
अत्यावश्यक सुविधा संगमनेरमध्येच उपलब्ध व्हाव्यात सध्या रेबीज इम्युनोग्लोब्युलिन (RIG) हे इंजेक्शन केवळ अहिल्यानगर येथील शासकीय (सिव्हिल) रुग्णालयात उपलब्ध आहे. आश्वी बुद्रुकपासून सुमारे १०० किमी तर संगमनेरपासून सुमारे १३० किमी अंतर असल्याने रुग्णांना उपचारासाठी ३ ते ४ तासांचा विलंब होतो. त्यामुळे हे इंजेक्शन संगमनेरमधील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
रेबीज इम्युनोग्लोब्युलिन (RIG) हे इंजेक्शन सध्या संगमनेर मधील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नाही. येणाऱ्या काळामध्ये सर्व आवश्यक औषधे आणि सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू. अशा घटनांमध्ये रुग्णांना तातडीने आणि मोफत उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे. आमदार अमोल खताळ,संगमनेर

शिर्डी मतदारसंघातील प्रत्येक कुटुंब हे विखे परिवाराचा भाग आहे. सुमनताई खेमनर यांच्यावर बिबट्याचा हल्ला झाल्यानंतर तत्काळ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या. मादी बिबट पिल्लासह जेरबंद झाल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
शालिनीताई विखे,माजी जि.प. अध्यक्षा
या घटनेदरम्यान स्थानिक युवकांनीही मोठे सहकार्य केले. संचालक विजयराव म्हसे, पत्रकार वैभव ताजणे, सुभाष होडगर, महेंद्र जऱ्हाड , मनोज होडगर, पवन मांढरे, वसंत त्रिभुवन, विशाल जऱ्हाड, सुरेश मदने, अमोल वाघ आदींनी वनविभागाला प्रत्यक्ष मदत करत मोहिम यशस्वी करण्यास हातभार लावला.

घटनास्थळी मादी बिबट पिल्लासह जेरबंद करण्यात आली असून परिसरात आणखी बिबट असल्याच्या शक्यतेने दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. आवश्यकते नुसार आणखी पिंजरे लावण्यात येणार असून थर्मल ड्रोनच्या माध्यमातून रात्री गस्त सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांनी दिली.


























0 Comments