
आश्वी बुद्रुक (ता.संगमनेर) चा कामगार तलाठी बाबासाहेब गंगाधर बोऱ्हाडे

आश्वी, वैभव ताजणे
जात प्रमाणपत्रासाठी सहा हजारांची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या सापळ्यात कामगार तलाठी रंगेहात — भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

संगमनेर तालुक्यातील महसूल यंत्रणेला हादरवणाऱ्या प्रकरणात आहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत आश्वी बुद्रुक (ता.संगमनेर) येथे कार्यरत असणाऱ्या कामगार तलाठी बाबासाहेब गंगाधर बोऱ्हाडे (रा. वडगाव लांडगा,ता.संगमनेर) याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. जात प्रमाणपत्र काढून देण्यासाठी सहा हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप असून या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराने आवश्यक सर्व कागदपत्रे दिल्यानंतरही प्रमाणपत्र मिळत नसल्याने संशय वाढला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी सापळा रचत कारवाई केली आणि तलाठीला बेड्या ठोकल्या. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपीकडून कागदपत्रांच्या नावाखाली पैसे उकळण्याचे प्रकार सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याच्या मालमत्ता, बँक खाते व इतर व्यवहारांची चौकशी सुरू आहे.
विशेष म्हणजे, आरोपी पूर्वी सेतू केंद्रात कार्यरत होता. त्या अनुभवाचा फायदा घेत अनेक नागरिकांशी संपर्क वाढवून शैक्षणिक व शासकीय दाखले मिळवून देण्याचे काम तो करत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर तोच एजंट म्हणून काम करत असल्याचे उघड झाल्याने प्रशासनात संताप व्यक्त होत आहे.स्थानिकांमध्ये अशीही चर्चा रंगली आहे की, परिसरातील अवैध उत्खनन व इतर वाळु तस्करी करणाऱ्या प्रकरणां मध्येही काहींना अभय देण्यात आले होते का? मात्र या बाबींची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. तपास यंत्रणांनी याबाबत सखोल चौकशी सुरू केली आहे.
लाचखोरी — समाजाला पोखरणारी किढ असुन भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई होत असली तरी कायद्यातील प्रक्रियेतील विलंब व सौम्य शिक्षा यामुळे दोषींना पुन्हा प्रणालीत परत येण्याची उदाहरणे दिसतात. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष वाढत असून, कठोर शिक्षा आणि जलद न्याय हीच भ्रष्टाचारावर प्रभावी औषध ठरू शकते, अशी मागणी होत आहे.सत्तेचा गैरवापर करून जनतेच्या हक्कांवर डल्ला मारणाऱ्यांना कायद्याचा फास आवळलाच पाहिजे. प्रामाणिक प्रशासन आणि जागरूक नागरिक यांची सांगडच भ्रष्टाचारमुक्त व्यवस्थेचा खरा पाया ठरू शकते




























0 Comments