महसूल अधिकाऱ्यांकडून घारगाव पोलीस ठाण्यात वाहतूक ठेकेदारावर गुन्हा दाखल

आश्वी,संजय गायकवाड,
संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर येथील श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड (युटेक) या साखर कारखान्याची तब्बल लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बीड जिल्ह्यातील वाहतूक ठेकेदार किरण अशोक नरवडे याच्यासह त्याचे वडील अशोक जबाजी नरवडे (दोघे रा. धामणगाव, ता. आष्टी, जि. बीड) यांच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महसूल अधिकारी अशोक सुरवसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, किरण नरवडे यांनी दिनांक २६ ऑगस्ट २०२३ रोजी युटेक साखर कारखान्यासोबत ऊस वाहतूक करारनामा करून अॅडव्हान्स म्हणून चार लाख रुपयांची रक्कम घेतली होती. यावेळी नरवडे यांनी त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या शेतीवर कारखान्याच्या नावाने आठ लाख रुपयांचा बोजा चढवला होता.यानंतर २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नरवडे यांनी कारखान्याच्या युटेक शुगर लि. या नावाने बनावट लेटरहेडवर बोजा कमी करण्याचे पत्र महसूल विभागाला सादर केले. संबंधित अधिकाऱ्यांनी फोनद्वारे कारखान्याशी संपर्क साधून चौकशी केली असता, असा कोणताही आदेश कारखान्याने दिलेला नसल्याचे स्पष्ट झाले.


पुढील तपासात नरवडे यांनी कारखान्याचे बनावट लेटरहेड, शिक्के, अधिकारी नावे आणि मोबाईल क्रमांक वापरून फसवणुकीचा प्रकार रचल्याचे उघड झाले. त्यामुळे महसूल प्रशासन आणि श्री गजानन महाराज शुगर लि. या दोघांचीही मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले.या प्रकरणी आरोपी किरण अशोक नरवडे आणि अशोक जबाजी नरवडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार कलम ३(५), ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३३८ आणि ३४०(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत.

0 Comments