राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्र जलसंपदा विभागाला “बेस्ट स्टेट कॅटेगरी 2024” पुरस्कार; मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वीकारला.

राहाता – प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी आशा नदीजोड प्रकल्पाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सर्व मंत्रिमंडळाच्या सहकार्यामुळे अनेक प्रकल्प वेगाने पूर्णत्वास जात असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा अहील्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

राज्यातील जलसंपदा क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीला मोठी गती मिळवून देणारा “बेस्ट स्टेट कॅटेगरी २०२४” हा राष्ट्रीय सन्मान महाराष्ट्राने पटकावला. हा पुरस्कार राज्यातील सिंचन व जलव्यवस्थापन क्षेत्रासाठी मोठे पाठबळ ठरणार.महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यातील सर्व सिंचन प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरु असून आगामी काळात विभागाचे कामकाज आणखी गतीमान होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जलसंपदा तथा अहील्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा राष्ट्रीय गौरव प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रासाठीचा हा सन्मान डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वीकारला.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने देशातील सर्व राज्यांच्या जलव्यवस्थापन, सिंचनक्षमता वाढ, धरण सुरक्षा, जलसंवर्धनाची अंमलबजावणी, तांत्रिक सुधारणा आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या निकषांवर मूल्यांकन करत महाराष्ट्राला अव्वल क्रमांक दिला.

२०२४ मध्ये जलसंपदा विभागाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होती. त्यांच्या कार्यकाळात विभागाचे कामकाज अधिक पारदर्शक, तांत्रिक आणि नियोजनबद्ध झाल्याने जलस्रोतांचे व्यवस्थापन, जलसंवर्धन, सिंचनक्षेत्राचा विस्तार आणि मोठ्या प्रकल्पांच्या वेगवान अंमलबजावणीला चालना मिळाली.

राज्यातील जल व्यवस्थापनातील सक्षम आणि शिस्तबद्ध कामकाजाचे हे यशस्वी प्रतीक असल्याचे ते म्हणाले.विभागातील अधिकारी, अभियंते, तांत्रिक कर्मचारी आणि स्थानिक पातळीवरील सर्व पथकांनी दाखवलेल्या समन्वय, प्रामाणिकपणा आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे हा सन्मान शक्य झाल्याचे ही त्यांनी आवर्जून नमूद केले.

जलसंपदा मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्यातील जलनियोजन, सिंचनक्षमता वाढ, प्रलंबित प्रकल्पांना वेग, निधी वितरणातील पारदर्शकता आणि जलस्रोतांचा शाश्वत वापर या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली असून महाराष्ट्र जलव्यवस्थापनात देशात अग्रणी राज्य बनले असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्रातील जलसंपदा क्षेत्राच्या एकात्मिक, दूरदृष्टीपूर्ण आणि सुजाण वाटचालीचे प्रतीक असून आगामी काळात विभागाची कामगिरी आणखी बळकट होणार असल्याचे स्पष्ट केले.


0 Comments